दुबई ः वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडने विश्वविजेत्या इंग्लंडला धक्का देत पहिले स्थान मिळवले आहे. टी-20मध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे, मात्र वनडे क्रमवारीत भारताला तोटा सहन करावा लागला आहे. वनडेमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली असून, ते तिसर्या स्थानावर पोहचले आहेत. नवीन माहितीनुसार, मे 2020 नंतर खेळलेले सर्व सामने 100 टक्के ठेवण्यात आले आहेत, तर मागील दोन वर्षांच्या सामन्यांचे गुण 50 टक्के ठेवण्यात आले आहेत. न्यूझीलंडने दोन स्थानांची कमाई केली असून, त्यांच्या खात्यात आता 121 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंड या दोन संघाचे 115 गुण आहेत, पण दशांश अंकात चांगली कामगिरी केल्यामुळे भारत तिसर्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. टी-20 क्रमवारीत इंग्लंडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. इंग्लंडच्या खात्यात 277 गुण आहेत, तर भारत इंग्लंडपेक्षा पाच गुणांनी मागे आहे. टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडलाही फायदा झाला आहे. ‘किवी’ संघ पाचव्या क्रमांकावरून तिसर्या क्रमांकावर पोहचले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसर्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंका आणि बांगलादेश एक स्थान मिळवून अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. दोन स्थानांच्या नुकसानामुळे वेस्ट इंडिजचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीतील अपडेटमध्ये 2017-18चे निकाल समाविष्ट नाहीत. 2019-20 या वर्षात खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आधारावर ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे.