अलिबाग ः प्रतिनिधी
लाचखोरीच्या प्रकरणात रायगडच्या महिला व बालकल्याण अधिकारी उज्ज्वला पाटील आणि त्यांचे लेखापाल भूषण घारे यांना अटक करण्यात आली आहे. धान्य पुरवठ्याची बिले मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार यांच्या सृष्टी एटरप्राईज कंपनीच्या वतीने महिला वसतिगृह कर्जत आणि शासकीय कुष्ठरोगी भिक्षेकरीगृह कोलाड येथे धान्यपुरवठा करण्यात आला होता. या धान्यपुरवठ्याची 40 लाख रुपयांची देयके अदा करायची होती. ज्यापैकी 14 लाख रुपयांची रक्कम तक्रारदार यांना यापूर्वी देण्यात आली होती. उर्वरित देयके अदा करण्यासाठी उज्ज्वला पाटील यांनी चार लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणीनंतर आरोपींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. याप्रमाणे तक्रारदार यांनी लाचेची रक्कम उज्ज्वला पाटील यांना दिली. त्यांनी ती टेबलवर ठेवण्यास सांगितली, तर लेखापाल भूषण घारे यांनी ती ताब्यात घेतली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, दीपक मोरे, विशाल शिर्के, महेश पाटील, कौस्तुभ मगर, आणि सुरज नाईक यांच्या पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असेल तर 02141-222331 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख सुषमा सोनवणे यांनी केले आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …