नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील सातत्याने 3500च्या वर आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यापासून बचावासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरजही त्यांनी या वेळी अधोरेखित केली आहे. देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सल्लागार शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसारी लाट येणार आणि ती थोपवता येऊ शकणार नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी आता लसी अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण कार्यक्रमाला वेग देणे गरजेचे आहे. देशात करोना संसर्गामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात यामुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे, असे डॉ. के विजय राघवन यांनी सांगितले. ज्या उच्चस्तरावर कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव होत आहे ते पाहता करोनाची तिसरी लाटही थोपवता येणार आहे. पण ही तिसरी लाट कधी येईल हे अद्याप स्पष्ट नाही. पण आपल्याला तिसर्या लाटेपासून सतर्क राहिले पाहिजे. लसी अद्ययावत करण्यासाठी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे राघवन म्हणाले. देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत करोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होत नाहीए. गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक 3780 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार भारतातील कोरोनाने मृत्यू होणार्यांची संख्या आता 2,26,188 इतकी झाली आहे. यादरम्यान 3,82,315 इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आता करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 3487229 इतकी झाली आहे. तर पॉझिव्हिटी रेट 24.80 टक्क्यांवर गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. तर काही राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन आहे.