पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाशी लढा सुरू असतानाच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळा पुर्व कामांना सुरूवात झाली असून जवळपास 50 टक्के काम पुर्ण होत आले आहे. प्रभाग अ, ब, क, डमधील नाले साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. एका बाजूला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पनवेल महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसर्या बाजूला पावासाळ्यापूर्वीची कामेही युद्धपातळीवर चालू आहेत. 19 एप्रिलला सुरू झालेली नालेसफाईची कामे 31 मेपर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. 20 प्रभागतील नाल्यांची साफसफाई संबधित स्वच्छता निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली चालू आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील काही नाले सिडकोकडे आहेत, तर काही पनवेल महानगरपालिकेकडे आहेत. पालिका हद्दीतील नाले स्वच्छता करण्याचे काम जोरात सुरू आहे. मोठ्या नाल्याची साफसफाई ही जीसीबी, डंपरच्या सहाय्याने केली जात असून छोट्या नाल्यांची साफसफाई ही कामगारांकडून केली जात आहे. आयुक्त महोदयांच्या सुचनेनुसार व शासनाच्या निर्देशानुसार विहीत मुदतीत चांगले काम करण्यास महापालिका कटीबद्ध असल्याची माहिती स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली.