मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी समजावून घेतली इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती

अलिबाग : जिमाका
लोकसभा मतदार संघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे दुसरे सत्र शनिवारी (दि. 13) सर्व विधानसभा मतदार संघांत पार पडले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे इव्हीएम, व्व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावून घेतली व आपल्या शंकांचे निरसन केले. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात झालेल्या येथे झालेल्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, ‘सर्व मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांनी पुरेशा गांभीर्याने मात्र ताण विरहीत काम करा‘ असे सांगितले. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.
निवडणूक आयोगाने प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीने काम करावयाचे आणि कुठल्या अडचणी आल्या तर कोणती कृती करायची हे व्यवस्थित दिले आहे. मतदानाअगोदर अभिरूप मतदान कसे करायचे त्याविषयीही मार्गदर्शन केले आहे. भारत इलेक्ट्रोनिकचे तंत्रज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून व्हिव्हिपॅट मशीन आणि त्याची कार्यपध्दती इव्हीएम मशीन व त्या अनुषंगाने सर्व तांत्रिक मदत मिळत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कर्मचारी आणि अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर मतदानाचे प्रमाण वाढीसाठी मतदार संघात घेतले जाणारे प्रयत्न सफल होतील आणि प्रमाण वाढेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मायक्रो ऑब्झर्वर अर्थात सूक्ष्म निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण सोमवारी (दि. 15) होणार आहे.