Breaking News

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा; नवी मुंबईत 50 टक्के खाटा रिक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पंधरा दिवसांपूर्वी शहरात सर्वच प्रकारच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांना खाटांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती आता बदलली आहे. दैनंदिन रुग्ण तीनशेच्या घरात आले असून पालिकेच्या डॅशबोर्डवर शहरातील रुग्णालयांमध्ये 50 टक्के खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे, मात्र अतिदक्षता, जीवरक्षक प्रणालींचा काही प्रमाणात तुटवडा कायम आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये शहरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आली होती, मात्र मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि दैनंदिन कोरोना रुग्णांत वाढ सुरू झाली. एप्रिलमध्ये तर शहरात झपाट्याने रुग्णवाढ होत दैनंदिन करोना रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली. 1441 दैनंदिन सर्वोच्च रुग्ण नोंदवली गेली. त्यामुळे उपलब्ध खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. अत्यवस्थ रुग्णांची संख्या ही 550पर्यंत पोहचल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना खाटा मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. 15 दिवसांपूर्वी तर शहरात एकही खाट शिल्लक नसल्याचे चित्र होते. त्यामुळे रुग्णवाढ कायम राहिल्यास शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र शासनाने कडक संचारबंदी लागू केल्यानंतर शहरातील हे चित्र बदलत गेले. दैनंदिन करोना रुग्णसंख्या कमी होत गेली व प्रशासनाने कामोठे एमजीएम, सिडको प्रदर्शनी केंद्र डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय व खासगी रुग्णालयातही अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक खाटांची संख्या वाढवल्याने शहरात खाटांची उपलब्धता झाली. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्या घरात आली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरात 50टक्के खाटा शिल्लक असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जात आहे. सर्व प्रकारच्या मिळून शहरात सहा हजार 765 खाटा असून 3 हजार 398 खाटा शिल्लक आहेत. त्यात साध्या खाटा 2643 तर प्राणवायू असलेल्या 685 खाटा शिल्लक आहेत. सद्य:स्थितीत 54 अतिदक्षता व 16 जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटा शिल्लक दाखवत असल्या तरी या खाटांसाठी रुग्णांची गैरसोय सुरू आहे. त्यात अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त असल्याने या खाटांचा तुटवडा आजही कायम आहे.

शहरातील खाटांची स्थिती

खाटांचा प्रकार    एकूण खाटा     व्यापलेल्या खाटा  रिक्त खाटा

साध्या खाटा       3874            1231              2643

प्राणवायू खाटा           2007            1322              685

अतिदक्षता खाटा          653              599               54

जीवरक्षक प्रणाली         231             215         16

एकूण खाटा       6765        3367        3398

कोरोना रुग्ण कमी होत असून कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाणही चांगले आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या पुढील दोन आठवड्यांत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अतिदक्षता खाटा उपलब्ध होत असून, या खाटांची मागणी चार टक्के तर जीवरक्षक खाटांची 40 टक्के मागणी होत आहे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

रुग्णदुपटीचा कालावधी 190 दिवसांवर

नवी मुंबई : मार्चमध्ये कोरोनाचे दैनंदिन रुग्ण वाढल्याने शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी घटला होता. 1 एप्रिल रोजी 80 दिवसांवर आलेला कालावधी 15 एप्रिलनंतर सातत्याने रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने 190 दिवसांवर गेला आहे. शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारीमध्ये 735 दिवसांवर गेला होता, परंतु आता 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सातत्याने रुग्णवाढ होऊ  लागल्याने रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत 50 दिवसांपर्यंत खाली गेला होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी वाढून तो 190 दिवसांवर पोहोचला आहे. हा नवी मुंबईकरांसाठी दिलासा असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply