Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारकडे बोट दाखवून वारंवार टीका करीत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांना समानतेची वागणूक देऊन वाटचाल करीत आहेत. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 8) पुन्हा एकदा आला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे, तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. तरीही रुग्णसंख्या वाढतच असून, या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहे. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत ते माहिती घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. या अनुषंगाने त्यांनी शनिवारी महाराष्ट्रोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोरोना स्थितीबाबत चर्चा करून आढावा घेतला.
राज्यात शुक्रवारी 54 हजार 22 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 37 हजार 386 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घऱी सोडण्यात आले आहे. राज्यात एकूण सहा लाख 54 हजार 788 कोरोना रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहे. दरम्यान, कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तिसर्‍या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी चर्चा करून माहिती घेतली आणि योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या.
कोरोना स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यातील परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा, सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती. शनिवारी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून, त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या काही मागण्या व सूचना केंद्राने मान्य केल्या याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे दूरध्वनीवरील संभाषणादरम्यान आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply