कोरोना महासाथीच्या दोन लाटांमध्ये जीवघेणे भोग भोगल्यानंतर फार दिवसांनी एक आनंदाची लाट मुंबईकरांवर चालून येऊ पाहात आहे. गेल्या सुमारे दीड वर्षामध्ये प्रथमच मुंबई महानगरीत रविवारी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. योगायोग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम जाहीर केला त्या मोहिमेचा 275वा दिवस रविवारी उजाडला. याचा अर्थ पावणे तीनशे दिवसांनंतर कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धात सुस्पष्ट यश आपल्याला दिसून आले.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या 26 तारखेला कोरोनाचा एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की कुणाच्या मृत्यूची बातमी कानावर आली नाही. जिवाचा थरकाप उडवणारे अॅम्ब्युलन्सचे भोंगे आजही ऐकू येतात. परंतु अशा आवाजाची सर्वसामान्यांना आता जणु सवय झाली आहे. मुंबई आणि लगतच्या परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता बराच कमी झाला आहे. संपूर्ण राज्यात जेमतेम पंधराशे ते सतराशे रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी मुंबईमध्ये एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नसली तरी 367 नवे रुग्ण आढणून आले आहेत. गेल्या 26 मार्चला अशाच प्रकारची नोंद झालेली दिसते. मुंबई महानगरीमध्ये गेल्या वर्षी 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर 6 दिवसांनी म्हणजेच 17 मार्च रोजी पहिला कोरोना मृत्यू नोंदला गेला होता. पावणे तीनशे दिवसांनंतर पुन्हा त्याच स्थितीला आपण येऊन पोहोचलो आहोत. हे सारे श्रेय कोव्हिड योद्ध्यांना जाते. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, अॅम्ब्युलन्सचे चालक, कोरोना रुग्णांना मदत करणार्या अनेक सेवाभावी संस्था या सार्यांनी मिळून केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. कोरोना यशस्वीपणे रोखल्याबद्दल राज्यातील सत्ताधारी स्वत:ची पाठ थोपटून घेतीलही. परंतु त्यात फारसे तथ्य नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. कारण कोरोना काळामध्ये या सत्ताधार्यांनी काय काय घोळ घातले ते सार्यांनाच ठाऊक आहे. अर्थात त्याची जंत्री देण्याची ही वेळ नव्हे. समाधानाचा सुस्कारा टाकण्याचा हा क्षण आहे. लसीकरणाने देखील आता चांगला जोर पकडलेला दिसतो. येत्या काही दिवसांमध्ये सारे निर्बंध उठवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याच्या बातम्या झळकत आहेत. परंतु तसे होण्याची शक्यता कमी वाटते. अजुन काही काळ तरी कोरोना प्रतिबंधक नियम आपल्याला पाळावेच लागतील कारण तिसर्या लाटेची भीती अजुनही पूर्णत: मिटलेली नाही. दिवाळीच्या आसपास सारे काही पूर्वीप्रमाणे सुरू करण्याच्या दृष्टीने पावले मात्र आतापासूनच टाकावी लागतील हे खरे. राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने नवीन नियमावली सरकारने जाहीर केली आहे. त्यात नेहमीसारखा गोंधळ दिसतो. उदाहरणार्थ नवीन नियमावलीनुसार कॉलेज कँटीन आणि कॅम्पसमधील दुकाने पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा ते आठ फुटांचे अंतर असायलाच हवे अशीही अट घालण्यात आलेली आहे. हे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कॉलेजमध्ये येताना बस किंवा लोकल गाडीने येणार आहेत याचा नियमावलीकारांना विसर पडलेला दिसतो. लोकल गाड्या आणि बस यांच्यामधील गर्दी दरदिवशी वाढू लागली आहे याचे भान सार्यांनीच ठेवलेले बरे. येणारा काळ सावधपणे काढायचा असला तरी आनंदाची ही तिसरी लाट पुन्हा पुन्हा येवो एवढीच इच्छा आहे.