पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेकडून गेल्या आठवडाभरापासून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडविरोधी लसीकरणाचा दूसरा डोस सुरू झाला आहे. लसीकरणासाठी प्रभाग क्रमांक 19 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा येथे येणार्या नागरिकांना सुविधा निर्माण करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच पालिकेच्या अधिकार्यांसमवेत पाहणी केली.
प्रभाग क्रमांक 19 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा येथे नागरिकांना बसण्यासाठी अपुरी जागा असल्यामुळे केंद्राबाहेर मांडव घालून खुर्च्यांची व पंख्यांची सोय लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर ह्यांच्या मार्गदर्शनाने पनवेल महापालिकेकडे केली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांना पहाटे 4.30 पासून रांगेत उभे रहावे लागते. या वेळी नागरिकांना आजूबाजूच्या अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ व्हावा यासाठी साफसफाई आणि उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यासाठी प्रभाग समिती ’ड’ चे अधिकारी कडू, सॅनिटरी इन्स्पेक्टर भोईर ह्यांच्या समवेत नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पाहणी केली.