114 दिवसांत 17 कोटींहून अधिक नागरिकांनी घेतली लस
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, मात्र असे असले तरी देशात आतापर्यंत 17 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 114 दिवसांत एवढ्या नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
भारतामध्ये 16 जानेवारी रोजी लसीकरणास सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्यसेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 60 वर्षांवरील नागरिक, 45 वर्षांवरील नागरिक आणि आता 18 ते 44 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकूण 17 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी चीनला 119 दिवस, तर अमेरिकेला 155 दिवस लागले होते.
देशात सोमवारी (दि. 10) सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 17 कोटी एक लाख 76 हजार 603 जणांचे लसीकरण झाले आहे. देशातील एकूण लसीकरणापैकी 66.79 टक्के लसीकरण हे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झाले आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना नागरिकांचे लसीकरणही वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.