माणगाव : प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 10) सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे या बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते. हे दृश्य पाहून माणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार कसा होणार, असा सवाल प्रशासनाला पडला आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. नेहमी गजबजणारी माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती, मात्र सोमवारी सकाळी दैनंदिन वस्तूंची खरेदी करण्यासाठी माणगाव बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. किराणा माल, फळे, भाजीपाला विक्रेते, कापड दुकानातून ग्राहक अधिक प्रमाणात दिसत होते. पोलीस व माणगाव नगरपंचायतीचे कर्मचारी नागरिक आणि दुकानदारांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत होते, मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत होते.