Breaking News

नस्ती उठाठेव

कोरोना महासाथ हे इतके मोठे संकट आहे की या घडीला प्रत्येकाने आपापला जीव सांभाळत एकमेकांना जमेल तितकी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. मदत शक्य नसेल तर किमान मदतकार्यात अडथळा आणू नये एवढी किमान जाणीव राजकीय नेत्यांना असायला हवी. परंतु काही राजकीय पक्षांना या संकट काळात राजकारणाची सुवर्णसंधी दिसते आहे. विशेषत: मोदीद्वेषाने पछाडलेल्या काही महाभागांना आपण कुठल्या थराला जात आहोत याचीही पत्रास ठेवाविशी वाटत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे.

कोरोना काळामध्ये कुणीही राजकारण करू नये असे सांगत सर्वच पक्षांचे नेते यथेच्छ राजकारण करून घेत आहेत. गेले सव्वा वर्ष संपूर्ण देश कोरोना महासाथीशी झुंजता-झुंजता मेटाकुटीला आला आहे. पण त्याचे भान विरोधी पक्षांना नाही. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची नावे ठळकपणे घ्यावी लागतील. या नेत्यांनी कोरोना काळातही राजकारण करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मानवतेचा कळवळा असल्याचे आविर्भाव मतदारांना मोहात पाडतील अशी त्यांची भ्रामक समजूत असावी. महासाथीच्या पहिल्या लाटेतून संपूर्ण देशाला बर्‍यापैकी सुखरूप बाहेर काढण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांना जाते. जातपातपंथभेद, पक्षीय राजकारण हे सारे मुद्दे बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षातील त्यांचे हजारो साथीदार गेले सव्वा वर्ष कोरोनाशी मुकाबला करत आहेत. ज्येष्ठतम नेत्यांपासून साध्याशा कार्यकर्त्यापर्यंत एक प्रचंड मोठी फळी भाजपने उभी केली. कुठलाही गाजावाजा न करता कार्यकर्त्यांची ही फौज अहोरात्र राबत असते. सारांश एवढाच की पंतप्रधान मोदी आणि सत्ताधारी भाजपने या घटकेला राजकारण बाजूला ठेवले आहे. मोदी इतके गप्प का, याचे खरे उत्तर राजकारणविरहित समाजकार्यातच दडलेले आहे. याचा अर्थ विरोधीपक्षांच्या निम्न पातळीवरील राजकारणाला पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी उत्तर देऊ शकत नाहीत असे नाही. परंतु अरेला कारे करण्याची ही वेळ नव्हे, एवढे भान त्यांनी ठेवले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव करून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी गड राखला, त्याने बहुदा काँग्रेसचेच धाबे दणाणले असणार. या निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. अनेक दशके देशावर अनिर्बंध सत्ता गाजवणार्‍या या पक्षावर प्रादेशिक पक्षाची कळा आली आहे. तरीही, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही या उक्तीनुसार काँग्रेस नेत्यांनी आपले वर्तन सुरू ठेवले आहे. अकरा विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या सह्या गोळा करून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून नवे राजकारण सुरु केले आहे. राजधानी दिल्लीतील प्रस्तावित सेंट्रल विस्टा प्रकल्पापासून पीएम केअर फंडापर्यंत असंख्य बाबतीत आक्षेप नोंदवणार्‍या या पत्रामुळे राजकारणाची दिशा बदलेल असे काही जणांना वाटते. परंतु तसे काहीही होण्यासारखी परिस्थिती नाही. पंतप्रधानांना निषेधाचा खलिता पाठवणारे हे बाराही विरोधीपक्ष जनतेने आधीच धिक्कारलेले आहेत. गेल्या सहा-सात वर्षांत या सर्वच पक्षांची अवस्था तोळामासा झालेली आहे. बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होणे शक्य नसते. काँग्रेस नेत्यांचे हे नकारात्मक राजकारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातील एक नस्ती उठाठेव ठरेल यात शंका नाही.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply