कर्जत : बातमीदार
तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बेकरे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी होत होती. अनेकदा लांबून येऊनदेखील ग्रामस्थांना माघारी जावे लागत होते. त्यामुळे बेकरे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र होण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी या केंद्रात 30 डोस उपलब्ध करण्यात आले होते. ऑनलाईन नोंदणी करून पहिला डोस गावातील मधुकर कराळे यांनी घेतला. माणगावच्या सरपंच कल्याणी सारंग कराळे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर काटे, ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र कराळे, शरद देशमुख, निकिता कराळे, मंदाबाई कराळे, ग्रामविकास अधिकारी संतोष पवार, सारंग कराळे, संदेश कराळे, आरोग्य सहाय्यक सुभाष चव्हाण, आरोग्यसेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.