Breaking News

पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको अधिकार्‍यांना सूचना

पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर, कामोठे, कळंबोली व नवीन पनवेल येथील पाणीपुरवठा समस्यांबाबत तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केल्याप्रमाणे सिडकोने दखल घेतली. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 1) सीबीडी बेलापूर येथे सिडको भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात सिडकोने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे नमूद केले.
आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, अमर पाटील, विकास घरत, प्रवीण पाटील, नीलेश बाविस्कर, नगरसेविका राजेश्री वावेकर, कुसुम म्हात्रे, तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील काही विभागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. हा पाणीपुरवठा नियमित होण्याकरिता, तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सातत्याने भाजपचे नगरसेवक सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पत्रव्यवहार व बैठकांच्या मार्फत करीत आहेत. सिडको या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि ही वस्तुस्थिती असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत अधोरेखित केले.
सिडको परिसरात वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कैलास शिंदे यांनी मान्य केले असून आवश्यक ठिकाणी नवीन जलकुंभांची उभारणी, जीर्ण पाईपलाईन बदली करण्याचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्याचबरोबर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी टाटा कन्सलटंट यांचे सहकार्य, तसेच स्काडा सिस्टीमची अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
…तर नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक!
मी माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातदेखील याबाबत अनेक बैठका घेऊन पाणीपुरवठा नियोजनासंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, परंतु दुर्दैवाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे नियोजन सिडकोमार्फत केल्याचे दिसून येत नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करीत सिडको प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास सिडकोविरोधात नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सिडकोने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे अधिकार्‍यांना सूचित केले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply