95 नागरिकांकडून 33 हजारांचा दंड वसूल
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत असला तरीही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी इतरत्र न फिरता घरात राहण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील काही नागरिक मॉर्निंग वॉक आणि इविनिंग वॉकसाठी बाहेर फिरताना आढळून येत आहे. पनवेल शहरातील काही ठिकाणी इविनिंग वॉकसाठी फिरणार्या नागरिकांवर पनवेल शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
शहरातील ठाणा नाका, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसर मार्ग, जेएनपीटी मार्ग, करंजाडे तसेच आदी ठिकाणी इविनिंग वॉक तसेच विनाकारण फिरणार्या एकूण 95 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण साधारण 33 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरीही अजूनही पूर्णपणे कोरोनामुक्ती झालेली नाही. यासाठी सर्व नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणाशिवाय विनाकारण फिरणे टाळावे जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी केले आहे.
विनाकारण फिरणार्यांची ‘आरटी-पीसीआर‘
पनवेल : वार्ताहर
खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परिसरात विनाकारण फिरणार्या नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येत आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्याने पनवेल परीमंडल 2 चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील व पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे क्र-3, नवीन पनवेलच्या वैद्यकीय अधिकारी विजया लोहारे यांच्याशी समन्वय साधून संयुक्त कारवाईमध्ये खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आदई सर्कल येथे विनाकारण फिरणार्या 70 लोकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे.
या कारवाईमध्ये वैद्यकीय पथकाचे पाच कर्मचारी व पोलीस दलाचे तीन अधिकारी व दहा कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. अशाच प्रकारे पनवेल शहर पोलीस ठाणे व खारघर पोलीस ठाण्यांतर्गत त्यांच्या परिसरातसुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही मोहिम यापुढेही राबविण्यात येणार आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करून प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे.
-देविदास सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे