पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 तसेच इतर विभागातील नाले, गटारे, रस्ते दुरूस्ती, डागडुजी, झाकणे लावणे आदी विविध प्रकारच्या मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबलेली आहेत, तसेच काही ठिकाणी गटारांचा काही भाग तुटलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी पसरते. काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत, तसेच औषध फवारणी, पावडर फवारणी आदी बाबतच्या तक्रारी नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याकडे केल्या होत्या. सोनी यांनी तत्काळ पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड यांची मदत घेऊन सफाई व कर्मचार्यांच्या साथीने त्यांच्या प्रभागासह ज्या ठिकाणांहून तक्रारी येत आहेत, त्याठिकाणी तत्काळ पोहचून तेथील परिसर स्वच्छ करून घेतला.
राजू सोनी हे अनेकवेळा ते स्वखर्चाने व स्वतः खाजगी कामगार लावून ही रेंगाळलेली कामे युद्धपातळीवर करून घेत आहेत. त्याबद्दल पनवेलकर राजू सोनी यांचे कौतुक करीत आहेत.