रोहे ः प्रतिनिधी : अष्टमी येथील सुर्वे आळीमधील एका घराला शनिवारी (दि. 13) रात्री आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सर्वच लोक घराबाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच सर्व अष्टमीकर मदतीला धावून आले. त्यांनी आग विझविण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. सुर्वे आळीतील एका दुमजली घरात प्रकाश सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, निवृत्ती सुर्वे या तिघांची कुटुंबे राहात असून शनिवारी रात्री 10 वाजल्याच्या दरम्यान या घराला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक व अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या सहाय्याने ही आग अटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत घरातील सर्व कपडे, भांडी, पुस्तके, अन्नधान्न आदी सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आग कशामुळे लागली हे समजले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. आग लागल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री अनंत गीते, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, अमित घाग, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …