पनवेल ः प्रतिनिधी
तौक्ते वादळाचा पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात वादळाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वादळात तालुक्यातील जवळपास 1212 घरांचे नुकसान झाले, तर एक नागरिक जखमी झाला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नुकसानग्रस्त ठिकाणांचे अद्यापही पंचनामे करण्याचे बाकी असल्याने नुकसानग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारपासूनच पनवेल परिसरात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली होती.सायंकाळपर्यंत हा जोर कायम असल्याने तालुक्यात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे विशेषतः फळबागांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडेदेखील उन्मळून पडलीत. शहरी भागात पालिका क्षेत्रातदेखील पथदिवे व इमारतीवरील पत्रे जोरदार हवेने उडाले आहेत. पालिका क्षेत्रात सिडको, पालिकेचे अग्निशमन दलाचे पथक यांच्या मदतीने ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू होते. पालिका क्षेत्रातदेखील वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये वादळामुळे 24 तासांपेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे विजेच्या खांबांवर पडल्याने देखभाल आणि दुरुस्तीकरिता बहुतांश गावांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला. वादळाचा धोका लक्षात घेता पनवेल शहरातील 200पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. नुकसानग्रस्त शेतकरी तसेच ग्रामस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी भिंगार ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष जेठू पाटील यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त गावे (आदिवासी वाड्या)
मोर्बे विभाग – 643 घरे
ओवळे विभाग – 54 घरे
तळोजा विभाग – 56 घरे
नेरे विभाग – 172 घरे
पोयंजे विभाग – 92 घरे
दापिवली विभाग – 39 घरे
पळस्पे विभाग – 41 घरे
कर्नाळा विभाग – 84 घरे
कळंबोली विभाग – 23 घरे
पनवेल – 8 घरे
वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंतच्या सर्वेक्षणात 1212 घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वादळात जीवितहानी झाली नसून एका जखमी नागरिकावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
–विजय तळेकर, तहसीलदार