संचालकांकडून प्रत्येकी 16 ते 29 कोटींची वसूली रक्कम सहकार विभागाने केली निश्चित
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 529 कोटी 36 लाख 55 हजार 26 रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित विवेक पाटील यांच्यासह 19 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले असून, त्यांच्यावर आणि मृत संचालकाच्या वारसांवर आरोपपत्रही बजावण्यात आले आहे. या सर्वांवर कर्जाच्या नुकसानीची वसुली करण्याच्या रकमादेखील निश्चित करण्यात आल्या असून, त्या प्रत्येकी 16 ते 29 कोटी रुपये आहेत. त्यामुळे विवेक पाटील यांनी भ्रष्टाचाराने लाटलेला पैसा आपण कसा भरायचा असा प्रश्न आता उर्वरित संचालकांपुढे पडला आहे.
बँकेचे तत्कालीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, व्यवस्थापक यांनी केलेले बोगस कर्जवाटप, अपकार्य, विश्वासघात, आर्थिक गैरव्यवहार यामुळे कर्नाळा बँक अडचणीत आली. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी 13 डिसेंबर 2019 रोजी सादर केलेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालामुळे ही बाब उघडकीस आली.
रिझर्व्ह बँकेने सादर केलेला अहवाल आणि पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी कारवाईतील निकषाच्या आधारे सहकार विभागाने वेगाने कार्यवाही केली. त्यामुळे या प्रकरणात ज्यांचा सहभागही नाही अशा संचालकांनाही त्यात ओढून हे प्रकरण कसे लांबेल आणि ज्यांचा संबंधही नाही त्यांना कसा त्रास होईल असा प्रयत्न करणार्यांचे तोंड या निकालाने आणखी कडू झाले आहे. कायद्याचे जुजबी ज्ञान असलेल्या काही जणांच्या पोटातही दुखू लागले असून, मंत्रालयात बैठका घेऊनही त्याचा काहीच उपयोग न झाल्याने ही मंडळी आता चरफडू लागली आहेत.
यापूर्वी संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 88नुसार आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दिलेले जबाब, दफ्तर आणि कागदपत्रांच्या छाननीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चे नियम 72नुसार नुकसानीच्या जबाबदारीची रक्कम निश्चित करून आरोपपत्र दाखल करण्यात आले.
नुकसानीची रक्कम आपल्यावर कायम का करण्यात येऊ नये, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 88 व नियम 72अन्वये योग्य ती पुढील कार्यवाही का करण्यात येऊ नये, असेही संबंधितांना विचारण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961च्या नियम 72(4)मधील तरतुदींनुसार आपल्या बचावासाठी कागदोपत्री पुराव्यासह आपले लेखी म्हणणे वा खुलासा 2 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे येथील उपनिबंधक कार्यालयात करायची संधी देण्यात आली आहे.
चौकशीमुक्त संचालक आणि पदाधिकारी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या स्थापनेपासून ते संचालक मंडळ बरखास्त होईपर्यंत संचालक, पदाधिकारी म्हणून काम केलेल्या सर्व आजी-माजी संचालकांना, पदाधिकार्यांना आणि मयत संचालकांच्या वारसदारांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यांनी खुलासा करून आपली बाजू मांडली आणि ती बाजू सहकार खात्याला मान्य झाली त्यांना चौकशीतून मुक्त केले आहे. त्यात लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यमान आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील, माजी नगराध्यक्ष जनार्दन मोरो म्हात्रे, नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्यासह सचिन सुभाष ताडफळे, रंजना श्रीकांत अथणीकर, निलकंठ महादेव घरत, केसरीनाथ बापू घरत, नारायण शंकर ठाकूर, रघुनाथ नारायण घरत, प्रशांत कृष्णकांत ठाकूर, गणेश सोमा सावंत, दयाराम हरी इंदुलकर, स्नेहा देशमुख, प्रवीण म्हात्रे या 16 संचालकांचा आणि तसेच (मयत) सदाशिव तुकाराम साबळे यांचे नातेवाईक कुंदा सदाशिव साबळे, नयन सदाशिव साबळे, सुनील सदाशिव साबळे, विनोद सदाशिव साबळे तसेच (मयत) मनोहर भालचंद्र सचदेव यांचे नातेवाईक पुष्पा महोहर सचदेव आणि विशाल मनोहर सचदेव तसेच (मयत) लक्ष्मण ननका वाल्मिकी यांचे नातेवाईक विवेक लक्ष्मण वाल्मिकी, श्रद्धा लक्ष्मण वाल्मिकी आणि पूजा लक्ष्मण वाल्मिकी या तीन मयतांच्या नऊ नातेवाइकांचा समावेश आहे.
संचालक, सीईओ यांच्यावर वसुलीसाठी सहकार विभागाने निश्चित केलेली रक्कम