Breaking News

दोन भावांमधील जमिनीच्या वादात तिसर्याचा बळी

अलिबाग : प्रतिनिधी : दोन सख्ख्या भावांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून भावाने भावाला मारण्याची सुपारी दिली, परंतु मारेकर्‍यांनी केलेल्या गोळीबारात तिसर्‍याचाच बळी गेला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. सागर पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गौरव भगत गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्रचा साथीदार नीलेश वाघमारे याला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मगर व त्याचा अन्य एक साथीदार फरारी आहे. पोलिसांना या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घटनास्थळी सापडली आहे. अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथे ही घटना घडली.

कुरूळ गावात राहणारे जितेंद्र मगर व राजेंद्र मगर या दोन सख्ख्या भावांमध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. राजेंद्र मगर याच्या मनात त्याचा राग होता. रविवारी (दि. 31) रात्री जितेंद्र हा त्याच्या मित्रांसह पार्टीसाठी कुरूळच्या दत्त टेकडीवर गेला होता. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास तेथून दुचाकीवरून परतत असताना दबा धरून बसलेल्या राजेंद्र मगर व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. एकूण पाच राऊंड फायर झाले. यात जितेंद्रचे दोन मित्र सागर पाटील व गौरव भगत हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच सागर पाटील याचा मृत्यू झाला, तर गौरव भगत यास उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.

कुरूळच्या दत्त टेकडीवरून पार्टी करून परतत असताना जितेंद्र हा त्याच्या बुलेट गाडीवर न बसता त्याचे दोन मित्र बुलेटवरून आले व तो दुसरी गाडी घेऊन आला आणि इथेच घात झाला. जितेंद्रची गाडी आली समजून या गाडीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात जितेंद्रचा मित्र सागरचा हकनाक बळी गेला.

कुरूळचे सरपंच अ‍ॅड. जनार्दन पाटील यांना धोका

कुरूळ येथील गोळीबार घटनेनंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. कुरूळचे सरपंच अ‍ॅड. जनार्दन पाटील यांनीदेखील राजेंद्र प्रकाश मगर यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार एका निवदेनाद्वारे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे केली आहे.

आपण सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यापासून कुरूळ हद्दीतील गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याबद्दल आलेल्या अर्जांवरून, तसेच वेश्वी ग्रामस्थांच्या अर्जावरून अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात राजेंद्र मगर यांनाही नोटीस देऊन त्यांचेही अनधिकृत बांधकाम तोडले होते. अनधिकृत पाण्याच्या पाईपलाईनवरही ग्रामपंचायतीने नियमानुसार कार्यवाही केली. त्यानंतर राजेंद्र मगर यांनी 25 मार्चपासून गावाबाहेर काही तरुण त्यांच्या घरात आणून ठेवले होते आणि त्यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात आली होती. या संदर्भात उपपोलीस अधीक्षक, तसेच गुन्हा अन्वेषण शाखेकडे तक्रारही करण्यात आली होती. 29 मार्च रोजी झालेल्या ग्रामसभेत राजेंद्र मगर यांना गावातून हद्दपार करण्याचा ठरावदेखील झाला असल्याचे अ‍ॅड. जनार्दन पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे राजेंद्र मगर याच्यापासून आपल्या जीविताला धोका आहे, असे अ‍ॅड. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply