पाली : रामप्रहर वृत्त
तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेला आंबा जमीनदोस्त झाला आहे. त्यात बागायतदरांचे करोडोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक पाहणीनंतर तब्बल 1550 हेक्टरवरील आंबा बागांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे आंब्याची झाडे उन्मळून पडली. त्यानंतर खराब हवामान, परतीच्या व अवकाळी पावासातून शिल्लक राहिलेल्या झाडांना जेमतेम 50 टक्के फळधारणा झाली होती. आता तौक्ते वादळाने हे उत्पादनदेखील हिरावून नेले असल्याने जिल्ह्यातील बागायतदार पुरते हतबल झाले आहेत.
सलग दोन हंगाम नुकसान
रायगड जिल्ह्यात सुमारे 14 ते 15 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. हेक्टरी एक ते दीड टन आंब्याचे उत्पादन येते. योग्य मशागत, खबरदारी व काळजी घेतल्यास तसेच हवामानाने चांगली साथ दिल्यास आंबा बागायतदारांच्या हाती चांगले उत्पादन लागते. साधारण 15 मेपासून अगदी जूनच्या पहिल्या, दुसर्या आठवड्यापर्यंत आंब्याची काढणी केली जाते. हा आंबा स्थानिक बाजारपेठेत विकून किंवा त्याची निर्यात करून बागायतदारांना चांगला पैसे मिळतात, मात्र मागील वर्षी लॉकडाऊनमुळे आंब्याची विक्री फारशी झाली नाही. व निसर्ग चक्रीवादळाचाही फाटक बसला. त्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले. अशा प्रकारे सलग दोन हंगामात बागायतदारांना नुकसानीचा फटका बसला आहे.
यंदा अवघे पन्नास टक्के उत्पादन झाले. त्यात काढणीला आलेला आंबा वादळामुळे वाया गेला. साधारण तीन लाखांचे नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
-विनायक शेडगे, आंबा बागायतदार
प्राथमिक नजर अंदाजानुसार तौक्ते चक्रीवादळामुळे 1550 हेक्टरवरील आंबा पीक बाधित झाल्याचे दिसून येते. पंचनाम्यानंतर यामध्ये कदाचीत वाढ किंवा घट होऊ शकते.
-दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक