भाजपच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद
कर्जत : बातमीदार
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजनमधून नेरळ गावातील तीन विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले.
नेरळ ही लोकसंख्या व आर्थिक दृष्टीने जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र या शहाराच्या विकासाच्या बाबतीत ग्रामपंचायत प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षाचे प्राबल्य असलेल्या प्रभागातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्याबाबत स्थानिक ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड व श्रद्धा कराळे यांनी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या प्रभागातील विकासकामे झाली नाहीत. ही बाब ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कानावर घातली. व नेरळमधील विकासकामांना निधी मिळावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत मंगेश म्हसकर यांनी जिल्हा नियोजनकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. जिल्हा नियोजनकडून नेरळमधील एकूण तीन विकासकामांसाठी 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नेरळ काशीनाथ नगर अंतर्गत रस्ता, वाल्मिकीवाडी अंतर्गत रस्ता आणि समाधान संकुल येथे साकाव अशी ही तीन विकासकामे असून या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले.
भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुनील गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, महिला मोर्चाच्या नेरळ अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, नेरळचे उपसरपंच शंकर घोडविंदे, सदस्य श्रद्धा कराळे, धर्मानंद गायकवाड, राजेंद्र लोभी, संतोष शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते केतन पोतदार, संभाजी गरुड, अमोल चव्हाण, गोरख शेप, दिनेश आढाव, नरेंद्र कराळे, दिलीप घुले, देवेन कुलकर्णी, हेमंत मेस्त्री, प्रकाश वाघ आदी या वेळी उपस्थित होते.