खोपोली : प्रतिनिधी
खोपोलीतील महात्मा फुले मंडई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिक व व्यापार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
लॉकडाऊनमध्ये फळे, भाजीपाला दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या वेळेत मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे व त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती प्रशासनाला होती व या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहने येत असल्याने पोलिसांवरही बंदोबस्ताचा ताण वाढत होता.
रायगड जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर करताना किराणा सामान, भाजी व फळ विक्री, चिकन, मटण, मासळी, रेशन दुकाने, फॅब्रिकेशनची कामे करणारी आस्थापने, शेतीची अवजारे, सिमेंट, ताडपत्री, विद्युत उपकरणे इत्यादी दुकाने आता रात्री आठवाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे सकाळी होणारी गर्दी आता कमी होणार आहे.
दरम्यान, या काळात झालेल्या चक्रीवादळाने अनेक घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, मात्र तातडीच्या दुरुस्तीसाठी सामान घेण्यासाठी दुकाने उघडी नव्हती. या सर्व बाबींचा विचार जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व डागडुजी करण्यासाठी लागणार्या साहित्यांची दुकाने दिवसभर उघडी ठेवण्यास अनुमती दिली आहे.