Breaking News

विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरणार

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भूमिपुत्रांच्या मेळाव्यात ग्वाही

उरण ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याची ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) जासई (ता. उरण) येथे आयोजित भूमिपुत्रांच्या मेळाव्यात दिले. भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या संघर्षमय लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवित राज्य सरकारची भूमिका बदलल्याशिवाय आता मागे हटणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रायगड जिल्ह्यातील जनआशीर्वाद यात्रेची सांगता मंगळवारी सायंकाळी उरण तालुक्यातील जासई येथे झाली. या ठिकाणी भूमिपुत्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ना. पाटील यांनी 1984च्या गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या आणि दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि त्यानंतर मेळाव्यात मार्गदर्शन केले.
लोकनेते दि. बा. पाटील सभागृहात झालेल्या या मेळाव्यास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपतराव गायकवाड, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, सुधीर घरत, जितेंद्र घरत, राजेश गायकर, निळकंठ म्हात्रे, सरपंच संतोष घरत, दीपक भोईर, सुनील घरत, गोपीनाथ म्हात्रे, चंद्रकांत पाटील, जितेंद्र घरत, रजनी घरत यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या संघर्षाची झोपी गेलेल्या महाविकास आघाडी सरकारने दखल घ्यावी, असे आवाहन केले. भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर करावा; अन्यथा भूमिपुत्र ‘दिबां’च्या नावासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
विमानतळाच्या नामकरणासाठी 2015 साली खासदार असताना मी ‘दिबां’च्या नावाची सर्वप्रथम मागणी केली होती. ‘दिबा’ हे आगळेवेगळे नेतृत्व होते. त्याच्या नावासाठी संघर्ष सुरू झाला असून यापुढे प्रत्येक भूमिपुत्र ‘दिबा’ बनूनच काम करेल, रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष करेल, असेही ना. पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार प्रकल्पग्रस्तविरोधी -आमदार महेश बालदी
या वेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रास्ताविक करताना जेएनपीटीने साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप करण्यासाठी सिडकोकडे 400 कोटी रुपये वर्ग केले आहेत, मात्र प्रकल्पग्रस्त विरोधी असलेल्या महाविकास आघाडी सरकारने अद्याप कामाचे टेंडरही काढलेले नाही. नवीन योजना नाहीत. विकासाचा पत्ता नाही, अशा शब्दांत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply