अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 189 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 158 लसीकरण केंद्र सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांच्या अखत्यारीत 17, तर पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत 14 लसीकरण केंद्र सुरू आहेत. यामधील जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र व निवडक उपकेंद्रांवर सुमारे एक लाख 26 हजार 515 लसींची मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आली. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रांवर एक लाख 9 हजार 662, पनवेल महापालिकेच्या केंद्रांवर 85 हजार 394 आणि खासगी लसीकरण केंद्रांवर 56 हजार 353 लसीची मात्रा देण्यात आली. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लसीच्या मात्रांपैकी 76 हजार 252 लाभार्थ्यांना लसीच्या दोनही मात्रा म्हणजे एक लाख 52 हजार 504 डोस देण्यात आले आहेत. दोन लाख 25 हजार 420 लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 21 हजार 901, तर फ्रंट लाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी, 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना तीन लाख 56 हजार 15 लसीचे डोस देण्यात आले असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
-जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम दृष्टिक्षेपात
लसीकरण केंद्र : 189
वितरीत लसी : तीन लाख 79 हजार 450
एकूण लसीकरण : तीन लाख 77 हजार 924
दोनही डोस घेतलेले : 76 हजार 252
केवळ एक डोस घेतलेले : दोन लाख 25 हजार 420