Breaking News

1 जूननंतर दुकाने उघडू द्या; व्यापार्‍यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : प्रतिनिधी

लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून व्यापाराचे जबर नुकसान होत आहे, असे महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी म्हटले आहे. व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्याच्या महसुलामध्ये त्याचे मोठे योगदान आहे. हे क्षेत्र आता अडचणीत आले असून व्यापार्‍यांनी काहीही उत्पन्न नसताना गेले दोन महिने कर्मचार्‍याचे पगार दिले, परंतु यापुढे कर्मचार्‍यांना घरबसून पगार देणे अशक्य झाले आहे. तसेच काम आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कर्मचार्‍यांवर आपल्या नोकर्‍या गमावण्याची वेळ आली आहे. पर्यायाने बेरोजगारी वाढत आहे. व्यापारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत असल्याने व्यापार्‍यांना व्यापार सुरू करण्याची परवानगी द्यावी. बाजारपेठांवर बंदचे निर्बंध आणि ई-कॉमर्स कंपन्या परवानगी नसताना राजरोसपणे जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त वस्तूंचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची व सहकार्याची आवश्यकता आहे. सरकारने व्यापार्‍यांना तीन महिन्यांचे वीज बिल व बँक कर्जावरील व्याज माफ करावे तसेच स्थानिक मालमत्ता कर माफ करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply