Breaking News

‘दिबा’ : विधानसभेतील एक बुलंद तोफ!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… महाराष्ट्रात सन 1972मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यातच सरकारी पातळीवर दिसणारी अनास्था व उदासीनता यामुळे लोकांचा सरकारविरोधातील रोष वाढत होता. आपला संताप व्यक्त करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने सुरूच होती. याचदरम्यान 19 ऑक्टोबर 1972 रोजी इस्लामपूर येथे प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांचा एक प्रचंड मोर्चा तेथील तहसील कार्यालयावर काढण्यात आला. शांततेने निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयाजवळ येताच त्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात चार जण ठार झाले. यात प्रा. एन. डी.पाटील यांचा पुतण्या सुरेश हाही मारला गेला. या गोळीबाराची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. सर्वत्र सरकारविरोधात संतापाची लाट उसळली. आदल्याच वर्षी वैराग या ठिकाणी झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले होते. दुष्काळग्रस्तांच्या मोर्चावर अशा प्रकारे सरकारने केलेल्या अत्याचाराचे पडसाद त्या वेळी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अत्यंत तीव्रपणे उमटले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस वगळता इतर सारे पक्ष एकत्र येऊन त्यांनी कौन्सिल हॉलच्या आवारात या गोळीबाराविरुद्ध घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना घेराव घालून दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी जोरदार मागणी केली. या प्रकाराने सरकार हादरले. त्यांची यंत्रणा जोरात कामाला लागली. या सार्‍या प्रकारात लोकनेते दि. बा. पाटील यांची कामगिरी महत्त्वपूर्ण होती. त्यांनी हे अधिवेशन दुष्काळी प्रश्नावर खूप गाजवले. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली.आणि दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा केला. कायदा झाला, पण त्याची अंमलबजावणी मात्र योग्य प्रकारे होत नसल्याचे लक्षात येताच विरोधी पक्षाने त्या विरोधात आवाज उठवला. दि. बा. पाटील हे या संबंधीची सर्व माहिती स्वत: मिळवत आणि ती विधानसभेत सादर करून सरकारला धारेवर धरत. ‘दिबा’ म्हणजे विरोधी पक्षाची विधानसभेतील एक बुलंद तोफ होती. शेतकर्‍यांच्या, शेतमजुरांच्या, कष्टकर्‍यांच्या प्रश्नावर ती जेव्हा धडधडायला लागे तेव्हा सरकार पक्षाचे अनेक बुरूज कोसळून पडत.

-दीपक रा. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply