Breaking News

मुरुड आगाराची बससेवा बंद, प्रवाशांची गैरसोय

मुरुड : प्रतिनिधी

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरुड आगारातून एकही एसटी बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जाण्यासाठीही मुरूड आगारातून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. येथून खाजगी वाहतूक फक्त मुंबई पुरतीच व थेट प्रवाशांनसाठीच सुरू असून, त्यातून अलिबाग, पेण, पनवेल येथे जाता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. एसटीच्या मुरूड आगारातून लवकरात लवकर बस सेवा सुरू कारावी, किमान मुंबई, ठाणे, बोरीवली अशा काही ठराविक फेर्‍या सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून एसटी बंद ठेवल्याने मुरूडमध्ये वर्तमानपत्रांचे पार्सल येत नाहीत. वर्तमानपत्र वाचण्यास मिळत नसल्याने वाचक नाराजी व्यक्त करीत आहेत. तालुक्यात 72 गावे असून, तेथील ग्रामस्थांना दुचाकीचा वापर करून लसीकरण व अन्य महत्वाच्या कामासाठी मुरुडमध्ये यावे लागते. वाहतूक बंद ठेवल्यामुळे मुरुड आगारलाही किमान 20 लाखांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. एसटीच्या मुरुड आगारप्रमुखांनी सकारात्मक विचार करून सुरुवातीला काही ठराविक फेर्‍या सुरु कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply