कर्जत : बातमीदार
माथेरानमध्ये ब्रिटिशांनी पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेक हा तलाव बांधला होता. मात्र सध्या पाणी गळती यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून शार्लोट लेकच्या संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून कोणते काम करायचे? याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी पाहणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शार्लोट लेकमधून माथेरानला पाणीपुरवठा करण्यात येतो. प्राधिकरणाकडून या तलावाची नियमीत देखभाल, दुरुस्ती करण्यात येत होती मात्र कालांतराने अपुरा निधी हे कारण पुढे करून तलावाची साफसफाई बंद झाली. दरम्यान, माथेरान नगर परिषदेकडून सुवर्णजयंती शहरी योजनेअंतर्गत निधी खर्च करून या तलावाची साफसफाई केली जात होती. या घटनेला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या तसेच पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता माथेरानला पाणीपुरवठा अपुरा पडू लागला. तसेच तलावात गाळाचे साम्राज्य निर्माण झाल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सरोवर संवर्धन योजने अंतर्गत माथेरानला अडीच कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून शार्लोट लेकची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या निधीतून वॉल टॉवर दुरुस्ती केल्यास तलावाची साफसफाई करणे, गाळ काढणे, पाणी गळती रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. परिसराचे सुशोभीकरण झाल्यास शार्लोट लेकचा कायापालट होणार आहे. जीवन प्राधिकरणाचे पनवेल येथील अधीक्षक अभियंता चंद्रकांत गजबीये यांनी शार्लोट लेक येथे येऊन अडीच कोटींच्या निधीमधून कोणती कामे करता येतील, याचा आढावा घेतला. तसेच माथेरानमधील पाणीपुरवठ्यासंदर्भातील समस्याही जाणून घेतल्या, प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (पनवेल) विजय कुमार सुर्यवंशी, उपअभियंता दीपक देशमुख, माथेरानचे शाखा अभियंता के. डी. देशमुख, उपअभियंता डी. इ. देशमुख, शाखा अभियंता विलास पाटील यांच्यासह नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगर परिषदेतील गटनेते प्रसाद सावंत माजी नगरसेवक अरविंद शेलार, कुलदीप जाधव आदी उपस्थित होते.