कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या सुरूवातीला वाढती रुग्णसंख्या, रुग्णांचे मृत्यू या बरोबरच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण या सार्यांचे पहिल्या लाटेच्या तुलनेत विक्रमच होते. मात्र लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आवरता आली. ती एकदम पाच पट कमी झाली. या सार्याला शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी आणि सुज्ञ कर्जतकरांची साथ लाभली. अजून थोडे दिवस असाच संयम ठेवला तर कर्जत तालुका कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. कर्जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी झाला. त्या वेळी इतके भयभीत वातावरण होते की, कोरोनाचा रुग्ण ज्या ठिकाणी सापडेल त्या भागात जाण्याची भीती वाटत होती. दोन टक्के कोरोना आणि अठ्याण्णव टक्के भीती होती. मात्र दुसर्या लाटेत कोरोनाची भीती राहिली नाही. उलट अठ्याण्णव टक्के कोरोना आणि दोन टक्केसुद्धा भीती राहिली नाही. केवळ दोन दिवस एकही रुग्ण आढळला नाही, त्यावेळी आता कोरोना गेला, या अविर्भावात सारे जण वावरू लागले होते. ना तोंडाला मास्क, ना सुरक्षित अंतर. या फाजील आत्मविश्वासामुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि तो अगदी शहरापासून ते दुर्गम आदिवासी भागातील वाडी – वस्तीवर जाऊन पोहोचला. मास्क न वापरणार्यांवर पुन्हा दंड आकारणी सुरू करावी लागली. दुकानांच्या वेळेत मर्यादा आणली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहे. दुसर्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव इतका आहे की, गेल्या वर्षी 103 कोरोना रुग्ण मृत पावले तर या वेळी अवघ्या पावणे दोन महिन्यात 117 कोरोना रुग्ण मयत झाले. या वेळी गावच्यागाव कोरोना बाधित झाली आहेत. पावणे दोन महिन्यांपूर्वी कोरोना बधितांची संख्या एकवीस – बाविसशे होती ती आता साडेचार हजारावर गेली आहे. मागील लाटेत कुटुंबातील एखादा सदस्य कोरोना बाधित झाला तर सारे कुटुंब भयभीत होत असे त्यात या वेळी आमूलाग्र बदल झाला आहे. आता उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला अगदी कोरोना वार्डमध्ये जाऊन अनेकजण जेवण भरवताना दिसतात. इतकी भीती नाहीशी झाली आहे. खरेदीसाठी शहरात जत्रेसारखी गर्दी होत आहे. साखरपुडा, हळदी समारंभ, लग्न सोहळ्यांना पाच – सातशेंची गर्दी होत असे. निर्बंध आणखी कडक केले तरी ही संख्या दोन – आडीचशेच्या खाली आली नाही. खरे तर यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शहरात गर्दी होऊ नये म्हणून कर्जत नगर परिषदने बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा बसणारे भाजी, फळ विक्रेते, फेरीवाले यांची व्यवस्था पोलीस मैदानात केली. मात्र तौत्के चक्रीवादळातील पावसामुळे मैदानात पाणी भरले, त्यामुळे हे सारे जण पुन्हा बाजारपेठेत ठाण मांडून बसले ते आजतागायत. खरे तर त्यांना पावसाळा सुरू होईपर्यंत पुन्हा पोलीस मैदानात हलविणे गरजेचे आहे. विनाकारण फिरणार्यांवर पोलीस ’लक्ष’ ठेऊन आहेत. तरीही चोर वाटेने ते शहरात येत असतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण ठेवले तर कर्जत तालुका पुन्हा कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही.