गड-किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची जोपासना करण्याऐवजी राजकीय संबंधांचेच संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पोलादपूर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक ठेव्यांकडे गेल्या काही वर्षांपासून दूर्लक्ष झाले आहे. त्यापैकी मंगळगड म्हणजेच कांगोरीगड या किल्ल्याचा समावेश गडकिल्ले संवर्धन योजनेमध्ये करण्याची गरज आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला तेव्हा तेथील धनसंपत्ती प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा किल्ल्यावर नेली. इ.स.1817 या मध्ये सरदार बापू गोखले यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अटक करुन मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स 1818 मध्ये कर्नल प्रॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.
महाडपासून दीड तास अंतरावरील पिंपळवाडी इथून कांगोरीगडाच्या अर्ध्यापर्यंत चारचाकी वाहन जाऊ शकेल असा कच्चा रस्ता अलिकडेच बांधण्यात आला आहे तर दुसरा रस्ता पोलादपूरपासून सुमारे 24-25 किमी अंतरावर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे काही अंतरावर वडघर गावातून सुध्दा गडावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी 6 तास लागतात. एकाच मोहिमेत चंद्रगड आणि कांगोरीगडावर चढाई करायची असल्यास गिर्यारोहक हा मार्ग अवलंबतात. वरंध घाटातील माझेरी या गावातून सहा तासांचे अंतर आहे. साहसाची आवड असणारे तरुण सडे या गावातून चढाई करतात. दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यास चढाई पूर्ण होते. सरळ-सोट वाढलेले मजबूत बुंध्यांचे मोठ-मोठाले वृक्ष आणि त्यांना गच्च लपेटलेल्या गर्द घनदाट वेलींनी त्या पायवाटेवर मंडप तयार केला आहे. त्या झाडा-झुडूपांतून बाहेर आल्यानंतर काळा कातळ जो अगदी सरळ रायगडाच्या टकमक टोकासारखा दिसू लागतो. येथेच असलेले प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे. केवळ शेजारील विटांचे गोलाकार बांधकाम बघून तेथे असलेल्या प्रवेशद्वाराची कल्पना येते. तिथून पुढे आल्यावर डाव्या हाताला निमुळती होत असलेली माची आणि उजव्या हाताला बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पायवाटेवर वार्याच्या झुळूकीसरशी लवणार्या मऊशार हिरव्याकंच पोपटी गवताची झालर हळूवार स्पर्श करीत असल्याचा अनुभव या चढाईतला थकवा दूर करणारा असतो.
उजव्या हाताला कातळात खोदलेले पाण्याचे दोन टाके आहेत तर समोर कांगुरीनाथाचे मंदिर आहे. गाभार्यात कांगुरीनाथासह काळभैरव, शिवलिंग यांचे पाषाण आणि घोड्याच्या पाच मुर्त्या तसेच इतर दोन मुर्त्या आहेत. बाहेरील सभामंडपात आणखी काही भग्नावस्थेतील पाषाण आहेत. स्थानिक लोक येथे येऊन देवाला राखण म्हणजेच बळीही देतात. सभामंडपातच नैवेद्य शिजवण्यासाठी बादली, मोठाले टोप, तांब्या, ताट अशी भांडी आहेत. याठिकाणी, चूल मांडल्याने राख उडून मंदिर परिसर अस्वच्छ झाला होता तसेच कोंबड्यांची पिसंही तिथेच टाकल्याने मंदिराच्या पावित्र्याला बाधा येत असल्याचे जाणवले. प्रथम गाभारा आणि सभामंडप स्वच्छ करून दीप प्रज्वलित केल्यानंतर वातावरण प्रसन्न होते आणि परिसर मंगल आणि पवित्र वाटू लागतो.
या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माचीवरून नयनरम्य दृश्य दिसते. माचीला जवळ-जवळ अर्धा किलोमीटर आणि 20-30 फुट उंच तटबंदी आहे. यावरून ढवळी व कामथी नद्यांचे खोरे पूर्ण दृष्टीपथात येतात. कांगोरी गडावरील पाण्याची दोन्ही टाकांत पाला पाचोळा पडला आहे.
उजव्या हाताला असणार्या वाटेवर बालेकिल्ला आहे. तेथे जाण्यासाठी सुरुवातीला अत्यंत निमुळती वाट असून एकावेळी एकच माणूस जाऊ शकत असल्याने जरा जपूनच मार्गाक्रमण करावे लागते. सुमारे 50मीटर अंतरावर गडावरील सर्वात मोठे टाके आहे. त्यातील पाणी जरा स्वच्छ पिण्यायोग्यही आहे. गडावरील या टाकांत बारमाही पाणी असते. बालेकिल्ल्यावर तीन भग्न वाडे आहेत. सुरुवातीला नुसता जोता असून त्याच्यापुढे दोन शिवलिंग पाषाणात घडवलेली आहेत. त्यापुढील दोन वाड्यांच्या भिंती दोन पुरुष उंच असून त्यांना एकच खिडकी असल्याने त्यांचा वापर कैदी डांबण्यासाठी होत असावा, असा अंदाज करता येतो. या वाड्यांच्या मागे जाणारी वाट तटापर्यंत जाते. तटावरून खाली पाहिल्यास आलेल्या वाटेचा अंदाज येऊ शकतो. हा तट 20-30 फुट उंच बांधला आहे. गडावरची माती भुसभुशीत असल्याने प्रत्येक पाऊल सावधपणे ठेवावे लागते. या मातीला येथे ’गांडूळकी’ ची माती म्हणतात. या मातीवरून पाय घसरण्याची शक्यता असते. मात्र, तरीही माती अत्यंत सुपीक असल्यामुळे एकवेळ पाऊस पडला तरी गवत गुडघाभर उंच वाढते. कांगोरी गडावर खूप झाडे आहेत. कडीपत्ता आणि काटेरी वांग्याचीही झाडे दिसून येतात.
कांगोरीगडावर गडभ्रमंती मोहिमेला वाव चांगलाच आहे शिवाय शिवकालीन गडकिल्ल्यांमध्ये रमल्याचा आनंदही भरपूर असल्याने या दूर्गभ्रमंतीचे वेड घेऊन कांगोरीगडावर स्वारी केलेल्या तरूण रक्ताला मिळणारी स्फूर्ती गडावर वारंवार येण्यास खुणावेल.
-शैलेश पालकर, खबरबात