मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय. अशावेळी लसी उपलब्ध नसल्याच्या या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर बनावट असल्याचा दावा करत, मुंबई महापालिकेचा हा कोरोना लस घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. मुंबई महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरची मुदत काल संपली आहे. त्यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते, पण शेवटच्या एका तासांत पाच टेंडर आहे. हे पाच टेंडर बनावट आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे देण्यात आली नाहीत. तसेच कागदपत्र देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आठ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकारने रेमडेसिवीर घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय. महापालिकेने रेमडेसिव्हीरसाठी प्रत्येकी एक हजार 568 रुपयांची ऑर्डर काढली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हाफकीनने 668 रुपयांची ऑर्डर काढली. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता रेमडेसिवीर पाठोपाठ कोरोना लस घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. या आरोपांना आता सत्ताधारी शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, यावरून राज्य सरकार मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप केला होता.