Breaking News

पदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीत बिघाडी?

सत्ता प्रिय नसल्याचा काँग्रेसचा सूचक इशारा

मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या आदेशावरून नवनवीन वाद निर्माण होत आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा देत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत संविधान नियमानुसार कामकाज महत्त्वाचे आहे. आम्हाला सत्ता प्रिय नाही, असे विधान करीत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे.
राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार दररोज नवनवीन मुद्द्यांवर एकमेकांविरोधात उभे राहत आहेत. अनेक विषयांबाबत वाद होत आहेत, तर काही विषय पेल्यातील वादळाची चर्चा ठरत आहेत, पण आता महाविकास आघाडीत पदोन्नती आरक्षणाच्या अध्यादेशावरून नव्याने वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने 7 मे रोजी आरक्षण पदोन्नतीसंदर्भात अध्यादेश काढण्यात आला. यामध्ये आरक्षणामधील अधिकार्‍यांच्या पदोन्नतीच्या जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्याने काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे. काँग्रेस पक्षाचा दलित मतदार हा मुख्य असून यामुळे तो नाराज झाल्याने काँग्रेसने स्वतःच्या सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पदोन्नती अध्यादेश रद्द करावा यासाठी आग्रहाची मागणी केली आहे. एवढेच नाही तर अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादही झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे नाना पटोले यांनी याबाबत बोलताना म्हटले की, पदोन्नती अध्यादेश रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर भूमिका स्पष्ट करू, पण सत्ता आमच्यासाठी प्रिय नाही. संविधानाच्या नियमावर आरक्षण असावे ही आमची भूमिका आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply