चक्रीवादळात रायगडातील घरे, आरोग्य केंद्र, शाळा इमारतींची पडझड;
पाणी योजना, फळबागा, बोटी, महावितरणचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. वादळग्रस्तांना आता शासनाकडील मदतीची प्रतीक्षा आहे.
तौक्ते चक्रीवादळचा रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीला तडाखा बसला. वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. हे काम आता पूर्ण झाले आहे. महसूल, कृषी, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांनी आपापल्या विभागातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
या वादळात चार जणांचा मृत्यू झाला. आठ जण जखमी झाले. 18 घरे पूर्णतः पडली. 13 हजार 575 घरांची पडझड झाली. 326 गोठे आणि झोपड्या वादळाच्या तडाख्यात सापडल्या. 10 जनावरांचा मृत्यू झाला. वादळाचा 1615 हेक्टर फळबागांना तडाखा बसला. यात सात हजार 864 शेतकरी बाधित झाले.
मत्स्यव्यवसायालाही वादळात मोठा फटका बसला. 12 मासेमारी बोटी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या. 346 बोटींची अंशतः मोडतोड झाली. 244 मासेमारी जाळ्यांचे अशतः तर 146 जाळ्यांचे पूर्णतः नुकसान झाले. 6.8 हेक्टरवरील मत्स्यशेतीही बाधित झाल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले आहे.
वादळामुळे तीन गावांतील पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या. 55 आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य केंद्रांची पडझड झाली. 151 अंगणवाड्यांना वादळाचा फटका बसला. 12 पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नुकसान झाले. 59 ग्रामपंचायत इमारती, 255 स्मशानभूमी, 132 समाजमंदिरे, 148 सार्वजनिक शौचालये, दोन कृषी गोडाऊन, 64 इतर सार्वजनिक मालमत्ता, 492 प्राथमिक शाळांची वादळात पडझड झाली.
सार्वजनिक बांधकाम विभाग महाड येथील सहा अनिवासी इमारती, 10 रस्त्यांचे नुकसान झाले. अलिबाग 15 शासकीय निवासी इमारती, 29 शासकीय अनिवासी इमारतींची पडझड झाली. आठ आश्रम शाळांचेही वादळात अंशतः नुकसान झाले. महावितरणच्या 81 किलोमीटर लांबीच्या उच्चदाब वाहिन्या आणि 149 किलोमीटर लांबीच्या लघुदाब वाहिन्या वादळामुळे बाधित झाल्या. उच्चदाब वाहिनीचे 322 खांब आणि लघुदाब वाहिन्यांचे 710 खांब पूर्णतः पडले. तर उच्चदाब वाहिनीचे 154 खांब, लघुदाब वाहिन्यांचे 240 खांब वार्याच्या जोरामुळे वाकले. 37 रोहित्रही बंद पडली. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या 85 इतर स्ट्रक्चरचेही वादळामुळे नुकसान झाले आहे.
चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर मदत वाटपाचे काम त्वरित हाती घेतले जाईल.
-डॉ. पद्मश्री बैनाडे, निवासी जिल्हाधिकारी, रायगड, अलिबाग