पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका कंपनीत कारवाई करीत 106 कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. यामुळे खोपोली-खालापूरसह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेे यांनी शुक्रवारी (दि.8) खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
खालापूर तालुक्यातील ढेकू येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात तपासणी करीत असताना इंडिया इलेक्ट्रिक फोर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या नावाचा बोर्ड लावून आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय सुरू होता. या कारखान्यात शासनाने प्रतिबंधित केलेले अमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याची माहिती खोपोली पोलीस ठाण्याचे अमलदार शेडगे व पाटील यांना प्राप्त झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व खोपोली पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक शितल राऊत, अधिकारीवर्ग, अंमलदार यांनी 7 डिसेंबर रोजी कंपनीत छापा टाकला असता त्या ठिकाणी गैरप्रकार आढळून आला.
पोलीस पथकाने कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीचालकांकडे या ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही योग्य परवाना मिळून आला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याने व काही कच्चा माल तसेच त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री असेंबल केल्याचे दिसून आले. तयार पक्का माल असलेली पावडर ही तपासणी केली असता हा एमडी म्हणजेच मेथड्रॉम असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान 107 कोटी 50 लाख रुपये किमतीची एकूण 85 किलो 200 ग्रॅम वजनाची एमडी पावडर तसेच 15 लाख 37 हजार 377 रुपये किमतीची किमती पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आणि 65 लाख रुपये किमतीची रासायनिक प्रक्रियेसाठी असेंबल केलेली साधनसामग्री असा माल खोपोली पोलिसांनी जप्त केला आहे. हा कच्चामाल कुठून आला तसेच तयार माल कुठे पाठविला जातो याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्याचप्रमाणे औद्योगिक पट्ट्यातील ज्या ज्या बंद पडलेल्या कारखाने आहेत त्याच्या संदर्भात एमआयडीसी व अन्न आणि औषध प्रशासन यांच्याशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती दिली.