सुधागड तालुक्यातील केंद्रचालक हवालदिल
पाली : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी पुरवणार्या केंद्रचालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मोबदला न मिळाल्याने सुधागडातील शिवभोजन केंद्रचालक हवालदिल झाले आहेत.
लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर, कष्टकरी, श्रमजीवी वर्गातील गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये, याकरिता शिवभोजन केंद्रातील थाळी प्रथम पाच रुपयात आणि नंतर पूर्णपणे मोफत देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याबदल्यात शिवभोजन केंद्रचालकांना राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सुधागड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शिवभोजन केंद्रचालकांना त्यांनी जमा केलेल्या बिलांचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांची अवस्था बिकट झाली आहे. रोज शेकडो लोकांना जेवण पुरवावे लागते, मात्र राज्य शासनाकडून अनुदान मिळत नाही, अशा परिस्थितीत शिवभोजन केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तर अनेकांवर हे केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे समजते.
पालीतील बल्लाळेश्वर मंदिर परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्राचे बिल मागील पाच महिन्यांपासून रखडले आहे. तेथील अंकिता मोरे यांनी सांगितले की, गेली दीड दोन वर्षे शिवभोजन केंद्र योजना सुरू आहे. सुरुवातीच्या काळात बिलाची रक्कम वेळेत मिळाली, मात्र आता आठ ते नऊ महिने बिले रखडली आहेत. किराणा मालाची उधारी झाली आहे, त्यांचा तगादा सुरूच असतो. केंद्रामध्ये काम करणार्या महिलांना पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न पडतो. आम्ही लोकांची पोट भरतो पण आमची थाळी रिकामी होतेय, राज्य शासनाने लवकरात लवकर बिले द्यावीत.
गरीब गरजू लोकांना वेळेत व पोटभर अन्न मिळावे, यासाठी आम्ही सकाळपासून झटत असतो, माझ्या केंद्रात पाच ते सहा माणसे काम करतात, मात्र मागील सहा महिन्यांपासून बिलाची रक्कम मिळाली नसल्याने केंद्र चालविताना अडचणी उभ्या राहत आहेत. आम्ही शासनाकडे बिले मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करीत आहोत, असे पालीत राम मंदिराच्या बाजूला शिवभोजन केंद्र चालविणार्या सुषमा कदम यांनी सांगितले.
शिवभोजन केंद्रामुळे गोरगरिबांची उपासमार टळली आहे, मात्र आमच्या बिलांना मोठा विलंब होतोय. आर्थिक अडचणींवर मात करून आम्ही शिवभोजन केंद्र चालवतोय, असे पेडली येथील शिवभोजन केंद्र चालविणार्या अश्विनी रुईकर म्हणाल्या.
सुधागड तालुक्यातील शिवभोजन केंद्रांची बिले जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केली आहेत. या केंद्रचालकांना लवकरात लवकर बिलाची रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड
ज्या शिवभोजन केंद्रचालकांच्या बिलांना विलंब होतोय, त्यांनी तहसील अथवा जिल्हा पुरवठा विभागात येऊन चौकशी करावी, शिवभोजन केंद्रांना लवकरात लवकर बिलाची रक्कम देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
-श्री. बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड