Breaking News

गुढी उभारू आरोग्याची

आज गुढीपाडवा. तमाम मराठी जनांचे नूतन वर्षाभिनंदन. गेले अवघे वर्ष आपण कोरोना महामारीशी झुंजण्यात व्यतीत केले. दुर्दैवाने आणखी एक गुढीपाडवा महाराष्ट्राला कोरोना महामारीच्या भीतीच्या छायेतच व्यतीत करणे भाग पडते आहे. अर्थातच राज्यातील सरकारी यंत्रणेचे अपयशच या परिस्थितीस जबाबदार आहे. सद्यस्थितीत जनतेने आपले कुटुंब आपली जबाबदारी म्हणत आपली काळजी घ्यावी आणि आरोग्याची गुढी उभारावी…

गुढीपाडव्याच्या दिवशी खरे तर एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या, नवे पोशाख परिधान करून नातेवाईक, मित्रपरिवाराच्या भेटीगाठी घायच्या आणि हर्षउल्हासपूर्ण वातावरणात नव्या उमेदीने नव्या वर्षाकडे पाहायचे. परंतु लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील परिस्थिती आज भयावह म्हणावी अशी आहे. मुंबई-पुणे-नागपूर ही मोठी शहरेच नव्हेत तर राज्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक छोट्या शहरांमधील रुग्णालयेही कोरोनाबाधित रुग्णांनी भरू लागली आहेत. रुग्णाची स्थिती चिंताजनक आणि बेड मिळत नाही याच परिस्थितीचा सामना सगळीकडेच सर्वसामान्यांना करावा लागतो आहे. ऑक्सिजन बेड किंवा आयसीयुच्या टंचाईबद्दल तर बोलायलाच नको. जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आलेली आपण यापूर्वी पाहिली आहे. तसे काही आपल्याकडेही होऊ शकते याचा अंदाज आपल्या राज्यातील सत्ताधार्‍यांना का आला नाही? त्यादृष्टीने आपली आरोग्ययंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी त्यांनी पावले का उचलली नाहीत? उलट कोरोना महामारीची पहिली लाट ओसरू लागताच आपली अवघी आरोग्ययंत्रणा जणू ढेपाळल्यासारखी झाली. आणि तशी ती का होणार नाही? राज्यकर्तेच जिथे वसुलीमध्ये मशगुल झाले होते, तिथे संकट-सुसज्जतेची अपेक्षा कुणाकडून करायची? राज्यभरात आज  रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजारही उफाळून आला असून तो आटोक्यात आणण्यात सरकारला अपयश येते आहे. रेमडेसिवीर उत्पादक कंपन्या गुजरातमधील असल्याने फडणवीस यांनी गुजरात सरकारशी बोलणी करून महाराष्ट्राला जास्तीत जास्त इंजेक्शन मिळवून द्यावीत अशी मागणी या सरकारमधील एक मंत्री करतात, तर दुसरे मंत्री फडणवीस यांनी केंद्राकडून लसी मिळवून द्याव्यात असे म्हणतात. फडणवीस यांच्या पुढाकाराशिवाय या सरकारला काही जमणार नसेल तर हे सरकार काय निव्वळ खुर्च्या राखण्याचे व या न त्या निमित्ताने केंद्र सरकारवर खापर फोडण्याचे काम करणार? वास्तवत: कोरोना साथीच्या व्यवस्थापनात या सरकारला पहिल्या लाटेच्या वेळीही अपयश आले आणि आताही सरकार तोंडावरच पडले आहे. स्वत:चे अपयश जनतेसमोर येऊ नये म्हणून फडणवीस यांच्यावर राजकारण करीत असल्याची टीका करणे एवढे फक्त या सरकारमधील नेत्यांना जमते. यांच्या नाकर्तेपणामुळे आता पुन्हा एकदा रेल्वेच्या बोगींमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. स्मशानांबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागू लागल्या आहेत. परिस्थिती भयावहच असली तरी राज्यातील सक्षम विरोधी पक्ष जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. राज्याला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यासाठी भाजप नेते दमणला रवाना झाले आहेत. भाजपकडून महाराष्ट्रासाठी 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जनतेच्या मदतीसाठी सज्ज आहेत. जनतेनेही कोरोनासंबंधी सर्व प्रतिबंधक नियमांचे पालन करून स्वत:ची काळजी घ्यावी. येणारे नवे वर्ष आपणां सर्वांनाच आरोग्यदायी जावो याच आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply