नागपूर ः प्रतिनिधी
कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवी व नववीतील, तर बारावीच्या विद्यार्थ्यांची अकरावीत असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाविषयीची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयातर्फे शुक्रवारी राज्य शिक्षण मंडळाला याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे कुठल्याही स्पर्धा होऊ शकल्या नाही. शालेय स्तरावरील राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धादेखील कोरोना महामारीमुळे आयोजित होऊ शकल्या नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणारे खेळाडू विद्यार्थी आधीच्या सत्रात क्रीडा स्पर्धा खेळले असतील ते क्रीडा सवलत गुणांसाठी पात्र ठरतात, असे या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.