केंद्रीय मंत्री गडकरींची ग्वाही
अहमदाबाद ः वृत्तसंस्था
आगामी तीन वर्षांत भारतामध्ये अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील, असे केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते बनासकांठा आणि दिसा यांना जोडणार्या 3.75 किमी लांबीच्या चौपदरी इलिवेटेड कॉरिडॉअरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी गडकरींनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात महामार्गांचे जाळे विणले जात आहे. रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी गडकरींनी देशात रस्ते बांधकामासाठी 15 लाख कोटी खर्च करणार असल्याचे जाहीर केले होते. विमानतळ, मेट्रोे, रेल्वेस्थानकांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे, असेही ते म्हणाले होते.