कर्जत : प्रतिनिधी
तौत्के चक्रीवादळानंतर जीवनावश्यक सेवा देणार्या दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. तर वीकेण्ड लॉकडाऊनसुद्धा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश आले. तर वीकेण्ड लॉकडाऊन म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सारे काही बंद रहाणार आहे. नियमावली बदलली की, कर्जतमधील व्यापारी व नागरिकांमध्ये नेहमीच गोंधळ उडतो. मंगळवारी नवीन नियमावली जाहीर झाल्यानंतर बुधवारी कर्जतमधील व्यापारी व पोलीस यांच्यामध्ये खटके उडून काही व्यापार्यांना पोलीस कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली होती. मात्र गैरसमज दूर झाल्याने व पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने सारे काही ठाकठीक झाले. आता पुन्हा वीकेण्ड लॉकडाऊन आहे की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील व पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ’वीकेण्ड लॉकडाऊन आहे. त्यामुळे शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील उर्वरित सारे बंद राहील. यासाठी व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल.’ असे स्पष्ट केले. दरम्यान, वीकेण्ड लॉकडाऊनबाबत नगर परिषद प्रशासनाने शहरात उद्घोषणा करून, त्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. म्हणजे गोंधळ होणार नाही, असे काही व्यापार्यांनी सूचित केले आहे.