लंडन ः वृत्तसंस्था
लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. कॉनवेने मार्क वूडला षटकार मारत त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. इंग्लंडमध्ये पदार्पण करताना दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कॉनवेने 347 चेंडूंत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. यामध्ये 22 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. द्विशतक झळकाविल्यानंतर पुढच्याच षटकात तो धावबाद झाला आणि न्यूझीलंडचा पहिला डावदेखील संपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 378 धावा केल्या. कॉनवेने 200, हेनरी निकल्सने 61 आणि नील वॅग्नरने नाबाद 25 धावा केल्या. डेव्हन कॉनवे कसोटी क्रिकेट इतिहासातील एकमेव फलंदाज आहे ज्याने पदार्पणाच्या पहिल्या डावात एका षटकारासह डबल शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या आणखी दोन खेळाडूंनी षटकार मारून दुहेरी शतके पूर्ण केली आहेत. मॅथ्यू सिन्क्लेअर आणि माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यांनी हे पराक्रम केले आहेत. 2003 साली इंग्लंडमध्ये परदेशी फलंदाजाने डबल शतक झळकावले होते. हा पराक्रम ग्रीम स्मिथने केला होता. आता कॉनवेने 18 वर्षांनंतर त्याची पुनरावृत्ती केली आहे.