कर्जत ः प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश परिपत्रकाद्वारे दिला होता. त्यानुसार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवसक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्य कारभार. शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही मन न दाखवणे, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 17व्या शतकात या महाराष्ट्रात भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधीशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युद्धे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस 6 जून 1674 हा आहे. हा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती. म्हणूनच हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावा, असा आदेश राज्य शासनाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयांना दिला. पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवसक राजदंड स्वराज्य गुढी उभारून सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अभिवादन केले आणि महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीताचे गायन करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.