Breaking News

रोजचे रडगाणे

आमचे पक्ष भाजपनेच फोडले असे रडगाणे गेले अनेक दिवस महाराष्ट्राचे मतदार ऐकत आहेत. खरे तर या रडगाण्याचा आता सगळ्यांनाच
कंटाळा येऊ लागला आहे.

मोगलांच्या फौजांच्या राहुट्यांचे कळस कापून नेणार्‍या संताजी-धनाजी या रणमर्दांची दहशत दुश्मनाने इतकी खाल्ली होती की मोगली घोड्यांना पाणी पिताना देखील संताजी-धनाजी यांचे चेहरे दिसत असत आणि ते बिथरून जात असत अशी आख्यायिका इतिहासामध्ये आढळते. महाराष्ट्रामध्ये उरलीसुरली उद्धव सेना आणि शिल्लक राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना भारतीय जनता पक्ष रात्री-अपरात्री दुस्वप्नामध्ये दिसू लागला आहे. भाजपचा विश्वासघात करून जनमत धुडकावून लावत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता काबीज केली. अशाप्रकारे लबाडीने प्राप्त केलेली सत्ता टिकाऊ नसते हे सर्वांनाच माहित होते, तसेच घडले. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळूनही उद्धव ठाकरे यांनी घरात बसण्याची सवय काही सोडली नाही. पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या नाहीत. इतकेच नव्हे तर आपल्या पक्षातील नाराज नेत्यांचे म्हणणेदेखील कधी ऐकून घेतले नाही. त्याची परिणती अखेर पक्ष फुटण्यामध्ये झाली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. आपल्या पक्षातील फुटीला संपूर्णत: आपणच जबाबदार आहोत याचा आत्मसाक्षात्कार ठाकरे यांना कधी होणार कोण जाणे! अजुनही पक्षफुटीचे खापर ते भाजपवरच फोडत आहेत. उरल्यासुरल्या ठाकरे गटाच्या काही नेत्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच शिवसेनाभवनात पार पडली, त्या वेळी ठाकरे यांनी भाजपवरच तोंडसुख घेतले. मनात आणले असते तर भाजपबरोबर जुळवून घेता आले असते, परंतु ते आपल्या नीतीमत्तेत बसणारे नाही असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले असे समजते. मनात येईल तेव्हा भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आणि मनात येईल तेव्हा जुळवून घ्यायचे हे अजबच तत्वज्ञान म्हणायचे. भाजपसारखा शिस्तबद्ध पक्ष म्हणजे ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असा बिना खिडक्या-दरवाजांचा पडका वाडा नव्हे. त्यामुळे ठाकरे यांची ती
दर्पोक्ती हास्यास्पद वाटते. पक्षाची वाट तर लागलीच आहे, त्याचे खापर भाजपवर फोडले की आपण नामानिराळे राहावयास मोकळे ही वृत्ती आत्मघातकी म्हणावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही जवळपास अशीच स्थिती आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बहुतेक सारा विधिमंडळ पक्ष सोबत घेत सत्तेचा गड गाठला. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व जुनेजाणते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद असावा अशी अटकळ बांधली जात होती, परंतु तशी परिस्थिती नाही हे आता कळून येऊ लागले आहे. आपले छायाचित्र अजित पवार गटातील नेत्यांनी सभास्थानी वापरू नये असा कडक इशारा शरद पवार यांनी दिल्यानंतर त्यांची छायाचित्रे न वापरण्याचा निर्णय अजितदादांच्या पाठिराख्यांनी घेतला आहे. मूळ पक्षात उरलेले ज्येष्ठ नेते जयंत पाटील लवकरच भाजपवासी होतील असे भाकित संजयकाका पाटील यांनी एका सभेत केले आहे. एवढे घडूनही आमच्या पक्षात फूट पडलेली नाही असाच दावा राष्ट्रवादीतर्फे केला जात आहे. भाजपने तीन वेळा आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. पक्ष सोडणारे नेते लहान बाळे नाहीत, एवढे तरी भान या नेत्यांनी ठेवावे. भाजपसारखा पक्ष स्वयंशिस्तीच्या जोरावर मोठा झाला आहे, फोडाफोडीमध्ये त्याला स्वारस्य नाही.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply