Breaking News

रानसई धरणातील पाणी आटले; महिनाभराचा साठा शिल्लक

उरण : प्रतिनिधी

वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे झालेले बाष्पीभवन यामुळे उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणाची पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना फक्त 33 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने उरणवासीयांवर पाणीटंचाईचचे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रानसई धरणातून  सध्या उरण नगरपरिषद, तालुक्यातील 21 गावे आणि एनएडी करंजा, ओएनजीसी, जीटीपीएस या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणाची उंची ही 120 फूट असली तरी धरणाच्या पाण्याची पातळी ही 116.5 फुटावर आहे. तालुक्यात वाढणारी वसाहत त्यांना जास्तचा लागणारा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उष्णतेमूळे धरणातून होणारे बाष्पीभवन त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाण्याची पातळी कमी होऊन सध्या 97.2 एवढी झाली आहे. पाण्याचा लाईव्ह साठा 1.365 एमसीएम शिल्लक राहिला असून 33 दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एमआयडीसीने सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा जलवाहिनीतून सहा एमएलडी पाणी घेत आहे. आणि उरण वासीयांचे पाणी संकट सोडविण्याचे प्रयत्न करीत आहे, मात्र रानसई धरणाची पाण्याची पातळी अतिशय खालावली असल्याने आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस एमआयडीसीकडून पाणी कपात केले जात आहे. त्याचप्रमाणे उरण पूर्व भागातील नऊ ग्रामपंचायतींच्या 17 गावांना सिडकोच्या हेटवणे धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या गावांना पाण्याची कोणतीही समस्या नाही, मात्र पुनाडे धरणावर अवलंबून असणार्‍या सहा ग्रामपंचायतीमधील 10 गावांना पाणी मिळत आहे ते पुरेसे नाही. याच पुनाडे धरणाचे लिकेज काढून डागडुजी केली, तर संपूर्ण उरण तालुक्याला पाण्याचा तुडवडा भासणार नाही. कालांतराने हा पाणी प्रश्न आणखी जटील बनणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आताच उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.

रानसई धरणामध्ये 33 दिवस पुरेल एवढा जिवंत साठा आहे. त्यामुळे आम्ही सिडकोकडून दर दिवसाचा सहा एमएलडी पाणी  पुरवठा घेत आहोत. जेणेकरून पाऊस होईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत चालला पाहिजे.

-रणजित कालेबाग, प्रभारी उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उरण

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply