पनवेल : वार्ताहर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या 347व्या वर्धापन दिनी पनवेलच्या गोल्डन ग्रुपने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून महाराजांना आगळीवेगळी मानवंदना दिली. बीजांकुरण प्रकल्पाचे या वेळी उद्घाटनदेखील करण्यात आले.
मोर्बे आणि रिटघर परिसरात संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रम केले आहेत. लावलेले प्रत्येक झाड जगवण्यासाठी ग्रुपचा प्रत्येक सदस्य कटिबद्ध असतो. आपण जरी वृक्षारोपण केले तरीदेखील ते झाड लावल्यानंतर त्याची पाच ते सहा वर्ष निगा राखावी लागते तरच लावलेल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होते. याची जाण असल्याने गोल्डन ग्रुप वृक्षरोपण सोबतच वृक्षसंवर्धनवरदेखील जोर देतो. यंदाचे वर्षी गोल्डन ग्रुपच्या वतीने बिजांकुरण कुंड हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आंबा, फणस, जांभूळ यासारख्या हंगामी फळांच्या बिया मृत्तिका कुंडात रुजविण्यात येणार असून त्यांना अंकुर आल्यानंतर त्यांचे पुन्हा रोपण करण्यात येणार आहे. अशाप्रकारे बिया लावल्यास त्या जगण्याची शक्यता अधिक असते असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेचे सर्वेसर्वा निळकंठ भगत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील, वसंत भगत, विजय पवार, संजय कदम, अमोल गोवारी, आशुतोष पाटील, प्रकाश भोपी, नरेश पाटील आदी उपस्थित होते.