उरण : वार्ताहर
उरणमधील सेव अवर बीच, उरण शटलर्स ग्रुप, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील पीरवाडी समुद्रकिनारी रविवारी (दि. 6) सकाळी 7 ते 11 या वेळेत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून युवकांचा यात खूप मोठा सहभाग होता.
या अभियानांतर्गत समुद्रातून वाहून आलेला कचरा, निसर्ग चक्रीवादळामुळे वाहून आलेला कचरा व इतर मानवनिर्मित कचरा (पर्यटकांनी फेकलेले कागद, प्लास्टिक बॅग, दारूच्या बाटल्या, वस्तू) आदी एकत्र गोळा करून समुद्रकिनारी साफसफाई करण्यात आली. सेव अवर बीच ग्रुपचे आर्यन घरत, अमोल दुरुगकर, कौशिक घाणेकर, भुमिका सिंघ, निकिता पाटील, ईश्वरी कोंडीलकर, उरण शटलर्स ग्रुपचे स्मित म्हात्रे, आदित्य घाणेकर, दिनेश बदिगर, सुजल कोठारी, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीचे सुदेश पाटील, प्रेम म्हात्रे, सुरज पवार, ओमकार म्हात्रे, नितेश पवार, हेमंत ठाकूर, विठ्ठल ममताबादे आदी पदाधिकारी सदस्य या पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनरुपी उपक्रमात, स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करत समुद्रकिनारी साफसफाई करण्यात आली. विविध सामाजिक संस्था, पर्यावरणवादी संस्थांनी या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक केले आहे.