Breaking News

पनवेल परिसरात पर्यटकांवर वॉच; नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार दंडात्मक कारवाई; पर्यटनस्थळी आढळल्यास कोविड चाचणीही केली जाणार

खारघर : प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या निर्बधांत काही प्रमाणात शिथिलता झाली असली तरी अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. या संदर्भात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या वर्षी पनवेलमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी झुगारुन पर्यटनस्थळांवर गर्दी केल्यास पर्यटकांना दंडात्मक कारवाईसह कोरोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.पनवेल तालुक्यात कर्नाळा अभयारण्य, कलावंतीण दुर्ग, खारघर हिल्स व पांडवकडा धबधबा, मोर्बे डॅम, आदई धबधब्यासह अनेक लहान मोठी पर्यटनस्थळे आहेत. रायगड जिल्ह्यात येणार्‍या पनवेल तालुक्याला जिल्ह्यात सर्वांत मोठा कोविडचा फटका बसला आहे. एकट्या पनवेल तालुक्यात कोविड रुग्णांचा आकडा 75 हजारांच्या पुढे गेला आहे. 1350 जणांना या कोविडमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. तरीसुद्धा अद्याप 1828 विद्यमान रुग्ण पनवेल तालुक्यात आहेत. या सर्व परिस्थितीशी लढत जिल्हा प्रशासन असो व पालिका प्रशासन यांनी आत्ता कुठे दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळविले असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्दी सार्वजनिक ठिकाणी होऊ नये म्हणून  प्रशासन खबरदारी घेत आहे.काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पर्यटनास्थळांचे अनेकांना आकर्षणदेखील वाटत असल्याने काही जण पर्यटन स्थळांवर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे, मात्र पर्यटकांना पोलिसांनी स्पष्टपणे सुचना करीत या पर्यटन स्थळांवर येण्यास मज्जाव केला आहे. विशेष म्हणजे अद्यापही कोविडचा धोका संपलेला नसल्याने पर्यटकांनी पावसाळी सहलीच्या नावाखाली घरातुन बाहेर न पडण्याचे अवाहन केले आहे.परिमंडळ दोनचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी याबाबत नागरिकांना विनाकारण घरातुन बाहेर पडून पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचे अवाहन केले आहे. पर्यटन स्थळांवर आम्ही पोलीस बंदोबस्त देखील ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोविडचा धोका संपलेला नसल्याने नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे अवाहन पोलीस उपायुक्त पाटील यांनी केले आहे. खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याने मुंबई उपनगरातील पर्यटक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावत असतो. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी संबंधित ठिकाणी 7 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही माळी यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply