Breaking News

1984च्या शेतकरी आंदोलनातील नागावकरांचा लक्षवेधी गनिमी कावा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
1984च्या या शेतकरी आंदोलनाच्या वेळी उरण परिसराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीतही सरकार विरोधातला आपला राग प्रकट करण्यासाठी पोलिसांना गनिमी काव्याने चकवा देत किंवा  निरनिराळ्या क्लुप्त्या योजून आंदोलक निदर्शने करीत होते. यात नागावच्या आंदोलकांनी दाखविलेल्या धाडसाचे खरोखरच कौतुक करायला हवे!
उरण परिसरात पोलिसांनी 27 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू करून पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव केला होता, पण नागावकरांना 16 तारखेला नवघर फाट्याजवळ आंदोलन करायचेच होते.आदल्या रात्री त्यांनी काही ठराविक कार्यकर्त्यांची शेतात एक बैठक घेतली.विचार पक्का झाला, पण कडक पोलीस बंदोबस्त असल्याने तेथे जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. त्यांनी ठरवले आपण लग्नासाठी नवरा काढायचा! बाळू पारधी हा तरुण नवरा व्हायला तयार झाला. रातोरात काही लग्नपत्रिका तयार झाल्या तर किसन घरत या ग्रामस्थाने नवरदेवासाठी आपला टांगा दिला. लग्नाची छत्री आणली गेली. एका ग्रामस्थाने ताशे आणण्याचे कबूल केले. अशा प्रकारे सर्व तयारी झाली.
दुसर्‍या दिवशी गावातील अनेक महिला करवल्या म्हणून यायला तयार झाल्या. नवरदेवाची आई म्हणून जनाबाई शंकर घरत या धाडसी महिलेने जबाबदारी स्वीकारली, तर अनेक गावकरी वराडी झाले होते.
या सर्व मंडळींनी गावातील जरीमरी मंदिरापासून सुरुवात केली. नवरदेवाला गावात फिरविण्यात आले. त्यामुळे गावातील अनेक जण त्यात सहभागी झाले. हा नवरदेव लग्नासाठी पागोटे गावात जाणार होता. तशी लग्नपत्रिका तयार केली होती. या सर्वांनी उरणची वेस ओलांडली आणि ते चारफाट्याजवळ आले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. दमदाटी करून चौकशी केली. त्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत व पत्रिका दाखवून वराड्यांनी आपली सुटका केली, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ही मंडळी फुंडे हायस्कूलजवळ गेली तोच मागून सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या आल्या. त्यांनी सर्वांना घेरले. नवरदेवाच्या वडिलांची पुन्हा सखोल चौकशी करून पत्रिका पाहिली आणि त्यांनी लाठीमार करायला सुरुवात केली.
कोणीतरी पोलिसांना खबर दिली की हे लग्नाचे वराडी नाहीत, तर नवघरला आंदोलन करण्यासाठी जाणारे आंदोलक आहेत. त्यामुळे पोलीस चिडले होते. त्यांनी महिला, लहान मुले यांची कसलीही पर्वा न करता प्रत्येकाला झोडपायला सुरुवात केली.
नवरदेव तर त्यांचे मुख्य टार्गेट होते.त्यांनी नवरदेवाला इतका चोप दिला की त्यांची पाठ माराने काळीनिळी पडली. एखाद्या गुराला बदडवतात तसे त्याला मारले, पण त्याही परिस्थितीत तो जवळच्या फुंडे गावात निसटला. इतर वराडी मंडळींचीही तीच गत झाली.तेही सैरावैरा पळाले. महिलांची हालत तर खूप वाईट झाली.
नागावकर आंदोलकांचा, लग्नाचे वराड नेण्याचा हा गनिमी कावा पोलिसांनी उधळला असला तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक करायला हवे.फितुरी झाली नसती तर ते नक्कीच यशस्वी झाले असते, पण 1984च्या या शेतकरी आंदोलनातील त्यांचा हा गनिमी कावा लक्षवेधी ठरला.

  • दीपक रा. म्हात्रे
    (ज्येष्ठ पत्रकार)

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply