Breaking News

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय आता पनवेलमध्ये

पनवेल : वार्ताहर

तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होत आहे. तसे आदेश नुकतेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने काढले असून सर्व कारभार पनवेल येथील खांदा कॉलनी येथे असलेल्या कार्यालयातून सुरू होणार असल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने प्रसिद्ध केले आहे. मागील बर्‍याच वर्षांपासून तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने तळोजा एमआयडीसी परिसरात असणार्‍या कंपन्यांसाठीचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता. तळोजा एमआयडीसीमध्ये असणार्‍या कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी 25 कि.मी.वर दूर असणार्‍या महापे येथील कार्यालयामध्ये फेर्‍या माराव्या लागत होत्या. त्यासाठी बराच वेळ आणि ऊर्जा वाया जात होती. तळोजा एमआयडीसीमध्ये लहान-मोठ्या एकूण 1622 कंपन्या असून त्यांना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी ठाणे जिल्ह्यातील महापे येथील प्रादेशिक कार्यालयामध्ये जावे लागत होते. महापे येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या चार एमआयडीसीमधील कंपन्यांची व्याप्ती एकूण 7758च्या आसपास असल्याने तेथे असलेल्या कामांचा पसाराही मोठा होता. प्रत्येक कामासाठी असंख्य फेर्‍या माराव्या लागत होत्या. त्यामुळे बराचसा वेळ वाया जात होता. त्या तुलनेने पनवेल येथील प्रादेशिक कार्यालयामध्ये सात एमआयडीसी मिळून फक्त 1807 इंडस्ट्रीज आहेत. महापे येथील कामांची व्याप्ती लक्षात घेता कामांचा निपटारा जलद गतीने होण्याकरिता प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने प्रादेशिक कार्यालय महापे यांच्या अखत्यारीत येत असलेल्या तळोजा, अतिरिक्त तळोजा, पाताळगंगा, अतिरिक्त पाताळगंगा या औद्योगिक क्षेत्राची सर्व कामे तसेच खालापूर टप्पा क्र.1 व 3 येथील भूसंपादनाची कामे प्रादेशिक कार्यालये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पनवेल यांच्याकडे वर्ग करण्यात आली. तळोजा एमआयडीसीपासून केवळ 9 कि.मी.वर असणार्‍या पनवेल येथे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्याने तळोजा इंडस्ट्रीयल परिसरातील कंपन्यांना सोयीस्कर झाले आहे. पनवेल येथे सुरू झालेल्या या प्रादेशिक कार्यालयामध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी प्रादेशिक अधिकारी म्हणून रवींद्र बोंबले, क्षेत्र व्यवस्थापक नेत्राली ठाकूर आणि सहाय्यक म्हणून ए. पी. गुर्जर कार्यरत असतील. तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांच्या व्यवस्थापनाने नव्याने सुरू झालेल्या प्रादेशिक कार्यालयासाठी पाठपुरावा करणार्‍या तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन व अध्यक्ष सतीश शेट्टी यांचे आभार मानले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply