Breaking News

बिरदोलेवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; नळपाणी योजनेला जलशुद्धिकरण केंद्राची जोड

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील बिरदोले येथील नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आले आहे. 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आल्याने आता बिरदोले ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे. भारत निर्माण योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या बिरदोले गावाच्या नळपाणी योजनेचे काम अनेक वर्षे रखडले होते. नळपाणी योजनेचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण व्हावे यासाठी दहिवली ग्रामपंचायत हद्दीमधील तत्कालीन उपसरपंच चिंधू तरे आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य अमर मिसाळ यांनी आर्थिक मदत करून नळपाणी योजनेचे जलकुंभ पूर्ण करून घेतले होते, मात्र त्यानंतर उल्हास नदीतून थेट पाणी येत असल्याने ते पाणी अशुद्ध असायचे. परिणामी पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन बिरदोले ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे जलशुद्धिकरण मशिनची मागणी केली होती. त्या अनुषंगाने 14व्या वित्त आयोग निधीमधून जलशुद्धिकरण मशिन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.त्यानुसार बिरदोले गावातील जलकुंभाखाली जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आले. त्याचे लोकार्पण ग्रामपंचायतीचे सरपंच चिंधू तरे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ ग्रामस्थ आंबो कालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुद्ध पाण्याचा पहिला हंडा भरून देण्यात आला. या वेळी उपसरपंच तथा सदस्य किसन जामघरे, ग्रामपंचायत सदस्य मेघा कालेकर, दिनेश कालेकर, माजी सदस्य मारुती कालेकर, कालूराम कालेकर आदींसह महिला उपस्थित होत्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply